राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर श्री विपिनकुमारजी (स्वीय सहायक, श्री भैय्याजी जोशी, सरकार्यवाह, रा. स्व. संघ) यांनी हिंदीतुन अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले होते. ते वाचनात आल्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद करावा असा विचार मनात आला. परवानगीसाठी विपिनजींना विचारणा केली असता "परवानगीची गरज नाही" या शब्दात त्यांनी अनुमती दिली. हिंदीतील मनोगतामधे जी सहजता आहे ती अनुवाद करतांना लुप्त होऊ नये म्हणुन शब्दशः अनुवाद न करता स्वैर अनुवाद करण्याचे धाडस केले आहे. संघावर अनुवादित का होईना पण लेख लिहिण्याचा हा पहिला प्रयत्न आहे, काही चुकले असल्यास दोष माझा असेल, मूळ लेख अप्रतिम आहे.
###########################
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाणून घेणे, संघाची माहिती करून घेणे जेव्हढे सोपे आहे तेव्हढेच अवघड आहे संघाला समजून घेणे. संघाच्या बाबतीत जे दाखविले जाते, सांगीतले जाते ते संघाच कार्य नाही तर ते संघ स्वयंसेवकांच काम आहे. संघाच कार्य आहे केवळ शाखा चालविणे व स्वयंसेवक तयार करणे, एक चांगला माणूस घडविणे, अन् अशा प्रकारचे वातावरण संपूर्ण देशभर तयार व्हावे या दृष्टीने सतत कार्यरत राहणे.
अस म्हणतात कि “संघ काहीच करत नाही अन् स्वयंसेवक सगळ काही करतात” आणि अशा प्रकारचे हे कार्य १९२५ पासून सातत्याने सुरु आहे. परंतू हे वरकरणी इतक सोप दिसत असल्यामुळे सामान्य जनांचा त्यावर पटकन् विश्वास बसत नाही अन म्हणूनच संघ "समजून घेणे" अवघड आहे अस म्हटलय व तो समजून घेण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात.
संघाची जी रचना आहे, जे माॅडेल आहे त्यासारखी रचना असलेल संघटन संपूर्ण जगात अन्य कोणतेही नाही व म्हणूनच संघाची तुलना अन्य कोणत्याही संघटनेशी होऊ शकत नाही. संघाला कसे समजून घ्यावे हा पण एक प्रश्नच आहे. प.पु. गुरुजी म्हणत "सरसंघचालक म्हणून गेली १५ वर्षे काम करत असतांना मला आता हळू हळू संघ समजू लागला आहे."
पण मग संघ समजण्या पलीकडे आहे का? संघाला कसे समजून घ्यावे ? तर याचे ऊत्तर अगदी सोप आहे. हृदयात सकारात्मक भाव ठेऊन, जिज्ञासू वृत्तीने, कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता व अतिशय शुद्ध अन्तःकरणाने संघाची माहिती करुन घ्या. हळू हळू संघ समजून येईल. संघाचे सगळे स्वयंसेवक हीच तर साधना आयुष्यभर करत असतात.
संघाला पाहायचे असेल तर लोक स्वयंसेवकांना पाहतात. स्वयंसेवक जे जे करतात, जे जे म्हणतात ते म्हणजेच संघ अशी त्यांची धारणा असते. हे पाहिल्यामुळे ज्या कोणाच्या मनात अशा प्रकारचे कार्य करावे अशी भावना जागृत होते, इच्छा विकसित होते ते पण संघाचेच एक प्रारूप आहे असे म्हणता येईल. संघाचा आपल्या स्वयंसेवकांवर विश्वास असतो व स्वयंसेवक जे करेल ते विचारपूर्वक व योग्यच करेल अशी संघाची खात्री असते.
संघ विचार काय आहे ? हा आणखीन एक प्रश्न ! देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून अनेक महान व्यक्तींनी या देशाच्या उन्नतीसाठी अविरत व अव्याहत प्रयत्न केले, त्यांचे विचार प्रेरक होते. या महापुरुषांच्या चिंतनाबरोबरच या देशाच भाग्य बदलून त्याला पुनः वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्यातील वाईट गोष्टींचा त्याग करावा व देशाच्या अस्मितेसाठी सगळ्यांनी आपसी मतभेद विसरून एकत्र यावे. अशा प्रकारचा विचार आपण विसरून गेलोे होतो. याच विचारांच सतत स्मरण व्हावे यासाठी पू. डाॅ. हेडगेवारांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना केली. इतका साधा व सरळ संघ विचार आहे.
आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक पंथ आहेत, अनेक समुदाय आहेत, नास्तिक आहेत तसेच मूर्तीपूजन करणारी मंडळीही आहेत, खाणे-पिणे, वेश भूषा, राहणी इ. इ. या सगळ्यांमध्ये किती विविधता आहे. परन्तू या विविधतेला जोडणारे एक सूत्र आम्हा भारतीयांमध्ये आहे. व ते म्हणजे “विविधतेमध्ये एकता शिकवणारी संस्कृती”, या सांस्कृतिक अस्मितेमुळे आम्ही सगळेजण एकत्र जोडलेले आहोत.
या देशात जन्मलेला, वाढलेला कोणीही व्यक्ती असु दे, त्याची पूजा पद्धती कोणतीही असु दे, तो कोणत्याही राजनैतिक विचारांचा असु दे, या व्यक्तीवर त्याच्या व्यक्तिमत्वावर असा एक विशिष्ठ प्रभाव दिसतो के जो अन्य देशातील कोणत्याही व्यक्तींवर दिसून येत नाही. जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा हा वेगळा व विशिष्ठ ठसा आपल्याला सहजासहजी दिसून येत नाही. परंतू, जेव्हा हिच भारतीय व्यक्ति जेव्हा विदेशात जाते तेव्हा ही विशेष सांस्कृतिक ओळख तेथील लोकांना ठळकपणे दिसून येते, जाणवते व तेथे आपण “हिंदुस्तानी”, “भारतीय", "हिंदू” म्हणून ओळखले जातो.
कारण या देशात राहणाऱ्यांचे पूर्वज बाहेरच्या देशातील नाहीत, ते सुद्धा याच देशातील होते, भारतीयच होते. त्यामुळे आपली विचारधारा, वैचारिक बांधिलकी कोणतीही असली तरी आपल्यात असलेल्या वेगळ्या "सांस्कृतिक अस्मितेमुळे" देशभक्तीची भावना मात्र प्रत्येकाच्या मनात तेव्हढीच उत्कट असते.
“हिंदू” हा भ्रमित करणारा शब्द आहे. हिंदू नामक कोणताही संप्रदाय, धर्म, पंथ नाही. हिंदू कोण आहे ? सगळ्या पंथ, संप्रदायाचा सन्मान करणारा, त्यांना स्वीकारणारा तसेच आपल्या व्यक्तिगत संप्रदायाला, मुल्यांना श्रद्धापूर्वक मानणारा, जपणारा म्हणजे हिंदू होय. जीवनात अनेक आव्हाने येत असतात. परंतु मानवी स्वभाव असा आहे कि आपण आधी सोपी सोपी आव्हाने, प्रश्न आधी सोडवतो अन अवघड प्रश्नांना नंतर सामोरे जातो. म्हणून जे जे स्वत:ला हिन्दु मानतात त्याचं संघठन आधी करायचं, त्यांचे आयुष्य अधिक चांगले करायचे हा दृष्टीकोन !
एकदा एका पत्रकाराने प.पु. गुरुजींना प्रश्न विचारला “ माझ्या गावात एकही ख्रिश्चन नाही, एकही मुसलमान नाही मग या गावात संघ शाखा कशाला ?” तेव्हा गुरुजींनी विनम्रतापूर्वक उत्तर दिले कि “या गावातच काय, पूर्ण जगात एकही ख्रिश्चन वा मुसलमान नसता व जर हिंदू या अवस्थेत असला असता तरीही संघाच हेच काम राहिल असते कारण संघाच कार्य हे कोणाच्या विरोधात नाही तर "हिंदू हित" रक्षण्यासाठी आहे."
संघ स्थापनेचा उद्देश्य मुस्लिमांना तोंड द्याव किंवा ख्रिस्ती धर्मप्रसारास प्रतिबंध करावा हा कधीच नव्हता. हिंदू हितांच रक्षण करण्यासाठी, हिंदू अधिक सामर्थ्यवान व्हावा म्हणुन हिंदू संघटित करण्याचा कार्य करणे हा संघ स्थापनेचा उद्देश होता. आपण प्रत्येकाने स्वतः मधे डोकावून पाहिल्यास आपल्याला अनेक त्रुटी आढळतील, त्यावर कालसुसंगत असा योग्य विचार आचरणात आणणे हे आपले प्रथम कर्तव्य ठरते. त्यानंतर इतरांचे संघटन, एकदा का संघटन झाले कि मग कार्य आपोआप होण्यास आरंभ होईल.
आंतरराष्ट्रीय बंधुभावनेच्या गप्पा करायच्या पण शेजारच्यांच्या अडचणी, दुःख याकडे दुर्लक्ष करायचे हे योग्य नाही. संघाची धारणा आहे आधी स्वतःमधे आवश्यक बदल घडवा व इतरांपुढे एक आदर्श ठेवा. परमेश्वराने हे मनुष्य जीवन स्वार्थासाठी दिलेले नसून ते परोपकारीतेसाठी आहे. त्याचा उपयोग राष्ट्राच्या ऊन्नतीसाठी केला पाहिजे. अशा प्रकारे त्याग व सेवा या गुणांनी युक्त माणुस घडविण्याची शाळा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे अस म्हणता येईल.
१९४० नंतर संघाचे विस्तारलेले स्वरुप पाहून सत्ताधारी मंडळींनी संघाविरोधात दुष्प्रचार करण्यासाठी सुरुवात केली. परंतु, संघ स्वयंसेवकांचे अविरत व खडतर परिश्रम यामुळे एक दशकानंतर एक वेळ अशी आली कि अन्य नेता मंडळींबरोबरच प्रधानमंत्रींनी मा. सरसंघचालकांनाही चर्चा, विचारविनिमय यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. १९६३ साली २६ जानेवारीच्या परेडसाठी संघाच्या पथकाचाही समावेश करण्यात आला होता. यानंतर स्वयंसेवकांनी आपली शिस्त व दृढनिश्चयाचे जोरावर विविध प्रकल्पांच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात संघकार्यविस्तार केला. पुढे आणिबाणीच्या कालखंडात संघाचे महत्व आणखीन ठळकपणे अधोरेखित झाले. संघाच्या प्रचारतंत्राने लोकशाही रक्षणाची महत्वपूर्ण भुमिका बजावली.
यानंतर मात्र लोकांचा संघाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. हे शक्य झाल कारण संघाचा विचार हा सत्याचा आहे, त्याला एक शुद्ध, पवित्र अशा नैतिक अधिष्ठानाची जोड लाभलेली आहे. या विचारसरणीला प्रत्यक्ष व्यवहारात आणणारी कार्यपद्धति तयार करण्याचा काम शाखेच्या माध्यमातून संघ करतो आहे. गमतीने अस म्हटले जाते कि सगळे काही बंद पडू शकेल पण संघशाखा कधीही बंद पडू शकत नाहीत.
संपूर्ण जगाला सुखी व वैभवशाली बनवायचे आहे तर त्यासाठी या भारतवर्षास परमवैभवशाली होणे अत्यावश्यक आहे. म्हणुनच संघाला समजुन घ्यायचे असेल तर आपल्या घराजवळच्या शाखेत जायला सुरुवात करा, संघाला समजून घेण्याचा यापेक्षा वेगळा व सोपा दुसरा मार्ग नाही.
No comments:
Post a Comment