मी ब्राह्मण, मी मराठा की मी मराठी?
शाळेत असताना आम्ही मराठ्यांचा इतिहास शिकलो. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पानिपतात मराठे लढले, अटकेपार झेंडा फडकवला. परंतु हे शिकत असताना, या पैकी कोण कुठल्या जातीचे होते हे आम्हाला कुणी शिकवलच नाही. नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, बाजीराव, सदाशिव भाऊ हे सगळे आमच्यासाठी फक्त मराठी साम्राज्याचे शिलेदार होते. मराठा, महार किंवा ब्राह्मण नव्हते. मग आता ते हायलाईट करण्याची गरज का भासायला लागली?
शेकडो वर्षे समाजावर उच्चवर्णीयांचा पगडा होता. परंतु कालांतराने हा भेदभाव कमी होऊ लागला हे ही तितकेच खरे आहे. पूर्वी वरच्या आळीच्या आणि खालच्या आळीच्या विहरी वेगळ्या होत्या. नदीचा भाग देखील विभागलेला होता. पण आता कोर्पोरेशनच्या एकाच पाईप मधून सगळ्यांच्या नळाला पाणी येते. पूर्वी ब्राह्मणांनी शिक्षणाचा अधिकार स्वतःपुरता मर्यादीत ठेवला होता. पण आता लेले आणि माने यांची मुले एकाच बाकावर बसून संस्कृत शिकतात, एकत्र डबा खातात. पूर्वी प्रत्येक जातीतल्या माणसाला वेगवेगळी कामे होती; आता एकाच ऑफिसमध्ये सगळ्या जातीचे लोक एकत्र काम करतात. इतकच नाही तर संद्याकाळी एकाच टेबलवर बसून एकत्र दारूही पितात.
समाजाची मानसिकता हळू हळू बदलत चालली आहे. शहरांमध्ये जातींमधली दरी झपाट्याने कमी होत आहे, तर गावांमध्येही चित्र बदलायला लागले आहे. मध्येच कुठेतरी माशी शिंकली आणि अचानक गंगा उलट्या दिशेने वहायला लागली. आज मराठा मोर्चा तर उद्या ब्राह्मण सभा. कशासाठी? यातून आपण नक्की काय साधत आहोत? मुठभर लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी समाजात परत एकदा फुट पाडत आहेत. जुळत चाललेली मने परत एकदा तोडत आहेत. आणि त्याचे पडसाद आता सोशल मीडियात जाणवायला लागले आहेत.
आजकाल सोशल मिडियावरचे प्रकार बघितले की भिती वाटते. फेसबुक वरच्या अनेक पोस्ट अशा भावनांनी बरबटलेल्या असतात. अशा पोस्टवर वेगवेगळ्या जातीचे लोक तावातावाने कमेंट देत असतात. भांडत असतात. ब्राह्मण असो वा मराठा, कुणीही यात मागे नाही. काल व्हॉट्सअप वर एका मोर्च्याचा व्हिडीओ बघितला. काही माथेफिरू कार्यकर्ते ज्या पद्धतीने भर रस्त्यात जे काही प्रकार करत होते ते निषेधाच्याही पलीकडचे होते. भयंकर आहे हे सगळं.
सभा, संमेलने, मोर्चे ही या प्रश्नांची उत्तरे नाहीत. हे प्रश्न सोडवायला कुठल्याही नेत्याची गरज नाही. या प्रश्नाचे उत्तर आपल्याच घरात दडलेले आहे. आपल्या मुलांवर आपण काय संस्कार करतोय याचा जरा विचार करा. स्वतःला शिकले सवरलेले म्हणवतो ना आपण? सुशिक्षित समजतो ना आपण? मग आपल्या मुलाला आपण आपल्याच कृतीतून काय शिकवतोय ते लक्षात घ्या. जी चूक आपल्या आधीच्या पिढ्यांनी केली ती सुधारण्या ऐवजी परत तिच चूक करू नका. आपल्याला प्रश्न सोडवायचाय की गुंता वाढवायचाय हे आपलं आपणच ठरवायचं आहे.
लहान मुले खरोखर निरागस असतात. त्यांना जात म्हणजे काय हे देखील माहिती नसते. मग त्याच्या मनात हे विष कालवतं कोण? तुम्ही आणि आम्ही. हो, आपण सगळेच याला जवाबदार आहोत. मुलांना जे समोर दिसते, त्याचे ते अनुकरण करतात. ते चांगले की वाईट हे समजण्याची कुवत अंगी येण्यापूर्वीच या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर रुजवल्या जातात. त्यांच्या नकळत आणि बऱ्याचदा आपल्या नकळत देखील.
या बाबतीत मी नशीबवान होतो. माझ्या वडिलांनी मला कधीच ही जातीची भाषा शिकवली नाही. कुठल्याही जातीला मी लहान किंवा महान मानत नाही. लक्षात ठेवा, कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहतो आणि चंदन कितीही उगाळले तरी सुगंधच देते. तुमच्या मुलांना तुम्हाला कोळसा द्यायचाय की चंदन हे तुमच्या हातात आहे.
No comments:
Post a Comment